नमने वाहुनी सुमने उधळा जयजयकार करा
नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्षहिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहून ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले.
लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती. भयानक छळ करून हवे ते कबुलीजबाब कोवळ्या तरुणांकडून जबरदस्तीने लिहून घेतले जात व पुढे न्यायालयात अभियोग उभा राहिला असता तसे निवेदन करूनही ते सर्व जबाब आरोपींविरुद्ध ग्राह्य धरले जात असत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर यांना कवी गोविंद यांच्या कविता प्रसिद्ध केल्याबद्दल काळ्यापाण्याची जन्मठेप सुनावण्यात आली.
स्वतः:ला सुसंस्कृत म्हणवून घेणारे इंग्रज ज्या कशाने हिंदुस्थानची अस्मिता जागी होईल, स्वाभिमान जागे होईल वा क्षात्रतेज जागे होईल असा संशय सुद्धा येणारे सर्व साहित्य जप्त करीत असत व ते साहित्य बाळगणे, प्रसिद्ध करणे, वितरीत करणे वा वाचणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरविला जात असे. कवी गोविंद म्हणजे तेच ते सुप्रसिद्ध ’रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ या काव्याचे जनक. वयाच्या आठव्या वर्षी अपंगत्व आलेले गोविंद यांचे कवित्व बालपणापासूनच दिसून आले होते. सुरुवातीला लावण्या व शृंगारिक काव्य करणाऱ्या गोविंदांनी पुढे अनेक ओजस्वी काव्ये लिहिली ज्यावर सरकारने बंदी आणली. क्रांतिवीर बाबाराव यांना ज्या चार आक्षेपार्ह कवितांसाठी जन्मठेप दिली गेली त्या कवी गोविंदांच्या चार कविता
१) बोधपर पुरातन मौज- ७ वे कडवे:
पुढे माजतील परके राक्षस कोणी जरी अनिवार।काळ्यांचा कलिराजा त्यांना करील सिंधू पार ॥७॥
२)शिवजन्मकालीन लोकमनोवृत्ती - १० वे कडवे:
आर्यांचा हा परिसून धावा गहिवरला गणराय रे।शिवरूपे मग येऊन मारी त्या परदास्या ठार रे ॥१०॥
३) रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले - ९ वे कडवे
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।असा भूतकालीन सिद्धांत जाणा।स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले।रणावीण स्वातंत्र्य कोणा मीळाले॥९॥
४) श्री शिवास मावळ्यांची प्रार्थना - ९वे कडवे:
तेव्हा शिवनेरी। शिव आले। मुदित मावळे झाले।तेणे डळमळले। परतचे। सिंहासन जुलुमाचे॥९॥॥शिवबा! ये रे ये॥
पुढे या अपंग कवीसही सरकारी जुलूम व छळ यांना सामोरे जावे लागले, मात्र आपल्या कवितांमुळे बाबारावांना शिक्षा झाली याचा सल त्यांना कायम होता.
त्या काळी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हा अत्यंत मग्रूर व जुलमी म्हणून कुख्यात होता. १८८८ साली हिंदुस्थानात आलेला मेसन टिपेटस जॅक्सन हा कालांतराने उत्तम मराठी व संस्कृतही जाणत असे. त्याला संस्कृतचे विशेष प्रेम होते. त्याने अनेक गरीब संस्कृत पंडितांना आर्थिक मदतही केली होती. त्याला गमतीने ’पंडित’ म्हटले जात असे व तोही असे म्हणत असे की गेल्या जन्मी मी या नाशिक क्षेत्रीचा ब्राह्मण असलो पाहिजे. मात्र तो कट्टर इंग्रज प्रथम होता. त्याच्या एक एक लीला जनक्षोभ वाढवितं होत्या. वयाने वडील असूनही तरुणांचे नेते म्हणून ज्ञात असलेल्या बाबासाहेब खऱ्यांचा छळ, त्यांच्यावर वारंवार सरकार विरोधी भाषणे केल्याचा आरोप ठेवत त्याने सातत्याने बाबासाहेबांच पिच्छा पुरवला व त्यांची वाताहात केली.
विद्याभूषण तांबेशास्त्री यांच्या बाबतही हाच प्रकार. कधी वंदे मातरम् च्या घोषणा दिल्यामुळे अटकसत्र. या सर्वाचा कळस ठरला तो गाडीवानाचा मृत्यू. एका उन्मत्त इंग्रज अभियंत्याने आपल्या मार्गात आला म्हणून भाऊसिंग या गरीब व निरपराध गाडीवानाचा लाथा बुक्क्यांनी मारून जीव घेतला. मात्र या प्रकरणात जॅक्सनने गोऱ्यांचीच बाजू घेत त्या प्रकरणात गोऱ्या अभियंत्यास निर्दोष जाहीर केले; पुढे खटला भरायचा प्रश्नच नाही. एकीकडे हे जुलूम आणि दुसरीकडे हुतात्मा मदनलाल धिंग्राने केलेला कर्झन वध वा त्या साठी स्वीकारलेले हौतात्म्य यामुळे नाशिकातील तरुणांचे रक्त सळसळू लागले.
उन्मत्त व हिंदद्वेष्ट्या जॅक्सनला यमसदनास धाडण्यासाठी पेटलेल्या तरुणांचे कट शिजू लागले. अखेर सर्व घडामोडींना निर्णायक स्वरूप आले व अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे व विनायक नारायण देशपांडे यांनी प्रत्यक्ष कामगिरी करायचे ठरले. मात्र जॅक्सन मुंबईला बढतीवर जाणार असल्याची खबर आली. नाशिक पालिकेतर्फे त्याला पानसुपारीचा समारंभ झाला. याच सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळी नाशिकात होती. जॅक्सन नाट्यप्रेमी असल्याने विजयानंद नाट्यगृहात होणाऱ्या खेळाला बोलावून त्याचा सत्कार करायचे ठरवले. आणि हाच दिवस हिच संधी या क्रांतिकारकांनी साधायची ठरवली. दिनांक २१ डिसेंबर रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी भर नाट्यगृहात जॅक्सनला अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले. अर्थातच त्याने सुटकेचा कसलाही प्रयत्न केला नाही. एकदा सरकारी दडपशाहीचा वरवंटा फिरू लागताच सर्व धागेदोरे हाती आले व अभियोग उभा राहिला. जॅक्सनचा वध हे केवळ एक निमित्त वा लक्षण आहे मात्रे हे क्षोभाचे द्योतक आहे व अन्यायाला आव्हान देण्याचा जनसामान्यांचा संग्राम आहे व खऱ्या अर्थाने हा सरकार उलथायचा लढा आहे हे सरकारचा ध्यानात आले होते.
भयानक छळ करून अनेकांकडून अनेक कबुलीजबाब लिहून घेतले गेले, जे पुढे अभियोगात नाकारत त्या छळग्रस्तांनी न्यायाधीशांना खरी हकिगत सांगितली पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. अखेर सरकारने निकालपत्र जाहीर केले
१ हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे फाशी
२ हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे फाशी
३ हुतात्मा विनायक नारायण देशपांडे फाशी
४ शंकर रामचंद्र सोमण काळ्यापाण्यावर जन्मठेप
५ वामन उर्फ दाजी नारायण जोशी काळ्यापाण्यावर जन्मठेप
६ गणेश बाळाजी वैद्य काळ्यापाण्यावर जन्मठेप
७ दत्तात्रेय पांडुरंग जोशी दोन वर्षे सक्तमजुरी।
ठाण्याच्या तुरुंगात असलेल्या या त्रयीसाठी १९ एप्रिल हा दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी या सर्वांना उठवावे लागले इतके गाढ ते झोपले होते. एकदा निश्चय झाल्यावर चिंता कसली? हुतात्मा कान्हेरे यांनी तर असे सुचविले की पायाखालची फळी कशी ढकलायची ते सांगितले तर ते काम ते स्वत:चं करतील. असामान्य धैर्याचे ते तीन महान क्रांतिकारक ठाणे येथील कारागृहात दिनांक १९ एप्रिल १९०९ रोजी राष्ट्राला दास्यातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात अभिमानाने फासावर गेले.
ठाणे मध्यवर्ती कारागृह
गेल्या रविवारी त्यांच्या हौतात्म्याला ९९ वर्षे झाली, म्हणजेच त्यांचे हौतात्म्य शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. हुतात्मा कान्हेरे, कर्वे व देशपांडे या क्रांतिकारक त्रयीला सादर वंदन.
क्रांतिरत्न बाबाराव सावरकर
कवी गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर
स्वातंत्र्याभिमानी बाबासाहेब खरे वकिल
हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे
हुतात्मा कृष्णाजी गोपाळ कर्वे
हुतात्मा विनायक नारायण देशपांडे
वामन उर्फ दाजी नारायण जोशी
No comments:
Post a Comment